आरोपींची गय केली जाणार नाही !;पालकमंत्र्यांची ग्वाही
माटणे येथे पत्रकारांना अरेरावी करण्याची घटना अतिशय निंदनीय आहे. संशयित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना आपण केल्या आहेत. या आरोपींची अजिबात गय केली जाणार नाही, त्यामुळे निश्चिंत राहा. प्रशासन जर कारवाई करण्यात कुचराई करत असेल असे आपणास जाणवल्यास आपण थेट माझ्याशी संपर्क साधा, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
माटणे येथे तालुक्यातील तीन पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५:३० वा.च्या सुमारास गेले होते. येथील पूर्वाचार देवस्थान जवळील काट्याजवळ रस्त्यालगतच पत्रकारांना मोठ्या प्रमाणात माती साठा करून ठेवल्याचे दिसले. त्यामुळे पत्रकारांनी तेथे जात फोटो काढण्याचा प्रयत्न केला. खासगी जमिनीत हा मातीसाठी असल्याने पत्रकारांनी जमिनीच्या गेटबाहेर उभे राहून मातीचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संशयित नवनाथ नाईक हा त्याच्या कारने तेथे आला व एका पत्रकाराला फोटो टिपण्यास मज्जाव केला. तसेच पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. गेट बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की करत गेटच्या आत नेले. त्यानंतर विठ्ठल नाईक हा लाकडी दांडा हातात घेऊन पत्रकारांच्या अंगावर धावून येऊ लागला. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करू लागला.

Comments
Post a Comment