दांडेली परिसरात ४०० काजू कलमे खाक
दांडेली वरचावाडा व न्हावेली-रेवटेवाडी येथील सुमारे चार ते पाच एकरांवरील काजू बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये ४०० ते ५०० काजू कलमे जळून खाक झाल्याची माहिती दांडेली ग्रामस्थ अमित नाईक यांनी दिली.दांडेली व न्हावेली सीमाभागात असलेल्या काजू बागायतीमधून विद्युत वाहिनी जाते. वासुदेव तुकाराम नाईक,दिलीप हरमलकर, भागीरथी नाईक, हनुमंत परब यांची मिळून ४०० ते ५०० काजू कलमे जळाली. पाच वर्षे मेहनत घेत, कर्ज काढून काजू कलमे लावली होती. परंतु, अचानक लागलेल्या या आगीत अंदाजे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु, सर्व प्रयत्न तोकडे पडले. ही आग बागेतून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांना शॉर्टसर्किट होऊन लागल्याचा अंदाज शेतकरी अमित नाईक यांनी वर्तविला. बागेत पालापाचोळा व गवत असल्याने आग भडकली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बागायती जळून खाक झाली.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वासुदेव नाईक, दिलीप हरमलकर, उदय हरमलकर, राहुल नाईक, दिनेश पेडणेकर, हरी नाईक, ओंमकार पेडणेकर, रमेश पेडणेकर, सिद्धेश नाईक, अमोल परब, बाळू पेडणेकर, तुकाराम नाईक, अमर नाईक आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

Comments
Post a Comment