प्रश्नांवर टोलवाटोलवी करणारे केसरकर वाढदिवस कसा काय साजरा करताहेत?;रुपेश राऊळ यांचा सवाल...
सावंतवाडी
दुष्काळ, दुदैवी घटना घडल्यानंतर वाढदिवस साजरा करणार नाही म्हणून सांगत टोलवाटोलवी करणारे दिपक केसरकर यंदा पाऊस एक महिना लांबल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी भावना व्यक्त करू शकले नाहीत मात्र आता त्यांच्याकडे मंत्री पदांमुळे आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित ठेवून वाढदिवस कसा काय साजरा करताहेत असा प्रश्न ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे.
यंदाच्या हंगामामध्ये पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे तरीही केसरकर त्याबाबत कोणतीही भावना व्यक्त करत नाहीत. यापूर्वी दुष्काळ, संकट निर्माण झाल्याची कारणं देत नामानिराळे राहिले आहेत त्यामुळे आता मात्र या सर्व बंधनातून मुक्त होऊन ते बॅनरबाजी करत थाटामाटात वाढदिवस साजरा करत आहेत हेच मोठे आश्चर्य वाटते असे राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
केसरकर यांनी वेळोवेळी नौटंकी केली आहे ही जनतेच्या मनात आहे, असे सांगून राऊळ म्हणाले, डीएड व बीएड बेरोजगारांना गेली पंधरा वर्षे न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासन त्यांनी दिले. मात्र मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देत नाहीत. शालेय शिक्षण मंत्री होवूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण डीएड व बीएड बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत. केसरकर वाढदिवस साजरा करताहेत तर बेरोजगार जलसमाधी घेण्याच्या आंदोलनाचा पवित्र्यात आहेत.हा असा दुर्दैवी प्रसंग निर्माण झाला असताना केसरकर वाढदिवस कसा काय साजरा करतात हे आश्चर्यकारक आहे.
मंत्री पदांमुळे केसरकर आर्थिक समृद्ध झाले. त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता निर्माण झाली त्यामुळे ते वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शन करत आहेत याबद्दल जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केसरकर यांनी नाहक टिका केली तर खपवून घेणार नाही असा इशारा राऊळ यांनी दिला.

Comments
Post a Comment