दोडामार्ग नगर पंचायत मधील रिक्त पदे तात्काळ भरावीत
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. मात्र, ही विकासकामे करताना अधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्यामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या या मागणीकडे लक्ष घालून रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली आहे.
येथील नगरपंचयातीच्या हनुमंत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, १९ मार्च २०१५ साली नगरपंचायतीची स्थापना झाली. या सात वर्षांच्या कालावधीत १५ मुख्याधिकारी लाभले. सध्यावेंगुर्लेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे येथील नगरपंचायतीचा प्रभारी कार्यभार आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकारी यांची बदली झाली. त्यातच अभियंता, कर निरीक्षक, लेखापाल ही महत्वाचीपदे रिक्त आहेत. आम्ही सर्व नगरसेवक नगरपंचायतीचा नियोजनबद्ध विकास आराखडा बनवत आहोत. मात्र, आमच्या या कामांना प्रशासकीय अधिकाऱ्यांची जोड न मिळाल्यास शहराचा विकास होणार तरी कसा? तसेच जनतेची छोटी-छोटी कामे होत नाहीत. जनतेचा रोष आमच्यावर आहे. त्यामुळे ही सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत.<br><br>शासन आपल्या दारी उपक्रम राबवायचा तरी कसा?<br><br>सध्या संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक शासकीय योजनांचे, उपक्रमांचे फायदे होणार आहेत. मात्र, नगरपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांचीच कमतरता असेल तर शासनाच्या योजना जनतेच्या दारांपर्यंत जाऊन राबविणार तरी कसे? असा सवाल नगराध्यक्ष चव्हाण यांनी उपस्थित केला.

Comments
Post a Comment