रक्षणकर्ता वेतोबा मालिकेचे १७ ला सावंतवाडीत “लॉचिंग" सोहळा;कलाकारांना भेटण्याची प्रेक्षकांना मिळणार संधी!
सावंतवाडी,ता.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रपाल श्री देव वेतोबावर आधारित मालिकेचा भव्य “लॉचिंग" सोहळा सावंतवाडी शहरात १७ जुलैला होत आहे. या पार्श्वभूमीवर वेतोबाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबत अन्य कलाकारांना भेटण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती सन मराठीचे प्रसिध्दीप्रमुख विनय नलावडे व कॉमेडी एक्सप्रेस फेम अभिनेते आशिष पवार यांनी दिली. दरम्यान या प्रमोशनच्या पार्श्वभूमीवर राजवाड्याकडे तीस फुटी वेतोबाचे पोस्टर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता आरती करुन शहरात रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर येथील वैश्य भवनात खास महिलांसाठी आनंदी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात अभिनेते आशिष पवार होम मिनिस्टरच्या धरतीवर फनी गेम्स् आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सन मराठीवर प्रसिध्द होणारी " क्षेत्रपाल श्री देव वेतोबा" ही सिरीयल १७ तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या प्रमोशन शो ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वैभव केंकरेही उपस्थित होते.यावेळी श्री.पवार पुढे म्हणाले, क्षेत्रफळ श्री देव वेतोबा ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेषता कोकणातील देवांमध्ये वेतोबाला मोठे स्थान आहे. येथील मातीचे आणि जनतेचे तो रक्षण करतो अशी येथील प्रत्येकाची भावना आहे. हीच श्रद्धा या मालिकेतून प्रेक्षकांना दाखवली जाणार आहे. या मालिकेचे भव्य लॉन्चिंग सावंतवाडीत होणार असून याच पार्श्वभूमीवर सन मराठीच्या प्रमोशनसाठी सुरू असलेला "आनंदाचा सोहळा" हा कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन आपण स्वतः करणार असून हा कार्यक्रम सन मराठीच्या यूट्यूब चैनल वर प्रसिद्ध केला जाणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे. तसेच प्रमोशन शो पाहण्याची आणि कलाकारांना भेटण्याची सुद्धा संधी मिळवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Post a Comment