तेरेखोल नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी; प्रवाहात उतरू नये...
तेरेखोल नदीची इशारा पातळी ४.२६० मीटर इतकी असून या नदीची धोका पातळी ६.२६० मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत या नदीची पाणी पातळी ४.७५० मीटर इतकी झालेली आहे. तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. तेरेखोल नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येणाऱ्या इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे या नदीकाठच्या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवश्यक सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.<br>गेल्या चोवीस तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बांदा येथे तेरेखोल नदीपात्राची पाहणी करत स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.यावेळी बिडीओ वासुदेव नाईक,बांदा तलाठी फिरोज खान उपस्थित होते.<br>इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे या ग्रामपंचायतीनी सखल भागात राहणाऱ्या तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या व्यक्तींबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आवश्यकतेनुसार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यावे, त्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांनी सुरक्षित निवाऱ्याकरिता शाळांची निवड करण्याच्या सूचना आपल्या अधिनस्थ यंत्रणांना द्याव्यात. नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलांवर पाणी आल्यास अशा पुलावरून वाहतूक होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावेत असे निर्देश देण्यात आल्याचे श्रीधर पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे. विशेषतः पूरस्थिती निर्माण होवून त्याकरिता होड्यांची आवश्यकता लागल्यास होड्या त्वरित उपलब्ध होतील या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे. पूराच्या पाण्याने झाडे उन्मळून पडल्यास ती बाजुला घेण्यासाठी आवश्यक कटर उपलब्ध करुन ठेवावेत. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी अशा सूचनाही देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Post a Comment