दमदार पावसाने बळीराजा सुखावला;शेती कामांना वेग
अनेक दिवस दडी मारलेला पाऊस बऱ्याच विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झाला. दमदार पावसाच्या आगमनाने शेतीकामांना वेग आला असून रखडलेली भातपेरणी मार्गी लागली आहे. तर नांगरणीसाठी लागणारे साहित्य एकत्र करण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ पाहायला मिळाली. एकंदरीत मान्सून सक्रिय झाल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे.
जूनच्या तोंडावर बिपरजॅाय वादळामुळे पाऊस लांबला अन त्याचा फटका शेतकऱ्यांसह बागायतदाराना बसला. पावसाने उसंत दिल्यामुळे शेतीची कामे अर्धवट झाली होती. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. दरम्यान जिल्ह्यात पाऊस दाखल झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजासह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पावसाने लॅाग ब्रेकनंतर दमदार हजेरी लावली. गेले कित्येक दिवस गर्मीने लाहीलाही झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. आगमनानंतर पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत पडलेला बळीराजा देखील सुखावला. पाऊस न पडल्याने यावर्षी शेतीलादेखील उशीर होणार आहे.
गुरुवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरु होती. उशिरा सुरू झालेली पेरणी आता जोर धरू लागली. तर शेतकरी नांगर, जू, फावडे, कुदळ, गुटा(फळी) आदी साहित्य सुरक्षित करताना दिसत आहे.

Comments
Post a Comment