युवतीचा विनयभंग करून ठार मारण्याचा प्रयत्न फसला;युवतीची सुखरूप सुटका
सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील गावात शेतात गेलेल्या युवतीचा विनयभंग करून तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केवळ युवतीच्या धैर्यामुळे फसला.मात्र या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत युवतीच्या कुटुंबियाने बांदा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.याप्रकरणी बाबलो शंकर वरक (४०,रा.कोनशी टेमवाडी) याच्याविरोधात भादंवि कलम ३०७,३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयिताला ताब्यात घेण्यासाठी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या नेतृत्वाखाली पथक कोनशी येथे दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कोनशी येथील वीस युवती आपल्या शेतात पंप बंद करण्यासाठी काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गेली होती.याच वाटेवर बाबलो वरक हा दबा धरून बसला होता.त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिला खाली पाडत गळ्यावर पाय ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्या युवतीने त्याच्याशी जोरदार झटापट करत आरडाओरडा करत आपली कशीबशी सुटका करून घेत गावात पळाली.तिने झालेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.
दरम्यान या घटनेचा धसका तसेच गळा आवळल्याने ती युवती अत्यवस्थ झाली.त्यामुळे तिला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.तिच्यावर डॉ.जगदीश पाटील यांनी उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.तर याबाबत रात्रौ उशिरा त्या युवतीच्या कुटुंबियाने बांदा पोलिसांत तक्रार दिली आहे.

Comments
Post a Comment