कोकणचा मेवाच बनला करिअरचा ‘गोडवा’

 खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक वाढत्या उन्हाळ्याच्या उष्म्यात थंडगार सरबताचा गोडवा मानवाला आल्हाददायक बनवतो. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत पिकणाऱ्या रानमेव्याचा  नैसर्गिक गोडवा जर सरबतातून मिळाला तर...हाच विचार घेवून ‘द रियल टेस्ट ऑफ कोकण’ ही ओळख घेवून फूड टेक्निशीयन असणाऱ्या श्रीमती संगिता श्याम माळकर रा.वेतोरे ता.वेंगुर्ले यांनी ‘गोडवा’ या नावाने सरबत निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे.


श्रीमती माळकर या पूर्वी ठाण्यामध्ये राहत होत्या. त्यावेळी त्या इतर उत्पादनाच्या मार्केटींग करत होत्या. फूड टेक्नोलॉजिचा त्यांनी यामध्ये डिप्लोमाही केला आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या कोकणातील मूळ गावी येवून 2017 साली कुडाळ एम.आय.डी.सी मध्ये ‘वत्सला एंटरप्राईजेस’ नावाने सरबत निर्मितीचा प्रकल्प सुरु केला. भाऊ परेश वरवडेकर यांनी सद्यस्थितीत या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत’ चालू वर्षी 1 कोटी 7 लाख 50 हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर केला. यासाठी त्यांना दोन हप्त्यांचे मिळून 20 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान  मंजूर झाले आहे. 

सध्या ‘गोडवा’ या नावाने आंबा, कोकम, अननस, फणस, जांभूळ, ऑरेंज, करवंदं, कैरी, आवळा या सरबतांबरोबरच पल्प, घावण, आंबोळी, कुळीथ पिठांबरोबर फणसपोळी, फणसवडी, आंबापोळी, आंबावडी, कोकणी मसाला, सांडगी मिर्ची, जाम अशी जवळपास 35 प्रकारची उत्पादने तयार केली जातात. नैसर्गिक स्वाद ग्राहकाला मिळण्यासाठी थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून फळांची खरेदी केली जाते. या प्रकल्पामध्ये महिला व पुरुष अशा 20 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्राहंकाच्या आरोग्याची काळजी घेत काही उत्पादनांमध्ये साखरे ऐवजी गुळाचा वापर करण्यात आला आहे. 

या उत्पादनाची विक्री मुंबई, गुजरात, बेंगलोर, तेलंगणा, नागपूर व स्थानिक बाजारपेठांमध्ये केली जाते. भविष्यातही या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे श्रीमती माळकर व श्री. वरवडेकर या बहीण भावांनी सांगितले.  

-

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे