करिअरला लसणाची फोडणी..!प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देण्याचा उद्योग
स्वयंपाक घरात स्वादिष्ट जेवणासाठी लसणाची फोडणी ही तृप्तीची ढेकर द्यायला भाग पाडते. परंतु, या लसूण पाकळ्या सोलून त्यावरील साल काढणे हे अत्यंत जिकिरीचे, कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. नेमके हेच हेरून यालाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या प्रांजली प्रमोद सुभेदार यांनी करिअर बनवले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे.
सावंतवाडी येथे तुळजाई एंटरप्राईजेस या नावाने लसूण प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. श्रीमती सुभेदार यांच्या पुतण्याचे हॉटेल होते. या हॉटेलसाठी त्यांना बाहेरुन लसूण आणावा लागत असे आणि अगदी तोही सोलण्यासाठी पैसे द्यावे लागायचे. याच वेळी हाच उद्योग आपण सुरु केला तर बचत गटातील महिलांनाही रोजगार मिळेल, शिवाय आपल्यालाही स्वयंरोजगार उपलब्ध होईल, ही संकल्पना त्यांच्या मनात चमकून गेली.
गुजरात,मुंबई येथून उद्योगासाठी आवश्यक असणारे लसूण गड्डे मागवून ऑक्टोबर 2022 पासून त्यांना हा उद्योग सुरु केला. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्री घेण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून जिल्हा सिंधुदुर्ग बँकेतून साडे सहा लाखाचे कर्ज घेतले. यामध्ये 35 टक्के सबसिडी मिळाली. या यंत्रांच्या माध्यमातून लसूण गड्ड्याच्या पाकळ्या वेगळ्या करणे, त्याची प्रतवारी करणे, पाकळ्यांवरील साल काढणे ही कामे केली जातात. यानंतर बचत गटातील आठ महिलांकडून पाकळ्यांची साफसफाई केली जाते. यासाठी महिलांना मजुरी दिली जाते. हा सोललेला लसूण तसेच लसणाची पेस्ट मागणीनुसार गोवा, सिंधुदुर्गमधील हॉटेलसाठी पुरविला जातो.
या व्यवसायाला खूप चांगली मागणी असून. चांगले अर्थार्जन होत आहे. मुलगा प्रणव हा यासाठी हातभार लावत आहे. भविष्यात हा व्यवसाय आपण वाढविणार असून,आले लसूण पेस्ट, शिल्लक राहणाऱ्या सालीपासून मसाजतेल, खत आणि डासांसाठीची धूप देखील बनवून विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्याचे श्रीमती सुभेदार यांनी सांगितले.
संपर्क क्र. 9403558605, जुळजाई एंटरप्राईजेस,सावंतवाडी
-

Comments
Post a Comment