महामार्गाला जोडणाऱ्या बोगद्यातील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करा
बांदा,ता.१९: शहरातील मच्छिमार्केट ते मुंबई-गोवा महामार्गला जोडणारा बोगद्यातील रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करावे अशी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आवटी यांच्याकडे केली आहे.
जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, शैलेश केसरकर यांनी सावंतवाडी येथे भेट घेत निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहराचा आठवडा बाजार हा आळवाडी मैदानात भरविण्यात येतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालक थेट महामार्गावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
या रस्त्याची सध्यस्थितीत दुरावस्था झाली असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तात्काळ या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीसाठी निरधोक बनवावा अशी मागणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता श्री. आवटी यांनी तात्काळ या रस्त्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन श्री. खतीब यांना दिले.

Comments
Post a Comment