मासेमारी नौकेचे फायबर फाटल्याने तारकर्ली समुद्रात नौका अर्धवट बुडाली
मालवण, ता. १६ : मासेमारी नौकेचे फायबर फाटल्याने समुद्राचे पाणी आत घुसल्याने शहरातील मेढा येथील रवी खांदारे यांच्या मालकीची सिद्ध प्रसाद ही नौका तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात अर्धवट स्थितीत बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी दुसऱ्या नौकेने धाव घेत तांडेल, खलाशी तसेच माल सुखरूप किनाऱ्यावर आणला. रात्री उशिरापर्यंत ही नौका बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
याबाबतची माहिती अशी- रवी खांदारे यांच्या मालकीची सिद्धप्रसाद ही मासेमारी नौका दोन दिवसांपूर्वी मासेमारीस गेली होती. आज सायंकाळच्या सुमारास नौकचा फायबर फाटल्याने समुद्राचे पाणी नौकेत घुसले. हा प्रकार तांडेलाच्या लक्षात येताच त्याने नौका किनाऱ्याच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात ही नौका अर्धवट स्थितीत बुडाली. हा प्रकार स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास येताच त्यांनी पात घेत घटनास्थळी धाव घेत नौकेवरील तांडेल, खलाशी यांना सुखरूप बाहेर काढले. नौकेवरील सर्व मासळी किनाऱ्यावर आणण्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत नौका बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Comments
Post a Comment