पोलिसांकडून सावंतवाडीत "सायबर-क्राईम" विषयी जनजागृती...

सावंतवाडी,ता.१४: सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या आव्हानाला बळी पडू नका. आपले आर्थिक, मानसिक व चारित्र्याचे नुकसान करून घेऊ नका, असे आवाहन करणारे पथनाट्य सादर करून सावंतवाडी पोलिसांनी आज शहरात जनजागृती केली. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांच्या बँड पथकाकडून देशभक्तीपर गीते वाजवून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. येथील गांधी चौक परिसर व बस स्थानक परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.


         सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना ऑनलाईन गंडा घालण्याचे काम केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी अज्ञातांकडून ऑनलाइन घातले जाणारे गंडे चारित्र्यहीन आदी बाबत जनजागृती करणारे विविध प्रसंग पथनाट्याच्या माध्यमातून सादर केले. कोणताही असा अनुचित प्रकार घडल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून केले. या पथनाट्यात पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते, सतिश कविटकर, मनीष शिंदे, स्वरा वरक, दिपीका मठकर, तन्वी सावंत, नंदीनी बिले, साहील पवार, निलेश सावंत आदी सहभागी झाले होते. तर अमित गोते, सागर कदम यांच्यासह मयुर सावंत, सुनील नाईक, राजा राणे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या पथनाट्याला सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे