सावंतवाडीतून युतीचे उमेदवार दीपक केसरकर:उदय सामंत

 सिंधुदुर्गनगरी,ता.२७: भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका भाजप व शिवसेनायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील. सावंतवाडीतून पुन्हा दीपक केसरकर निवडणूक लढवतील तर कुडाळ-मालवणचा निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेतील, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत


राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिली. दरम्यान लोकसभा मतदार संघात युतीच्यावतीने शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवेल, असेही त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सामंत गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी विधानसभा मतदार संघनिहाय पक्षाच्या बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले, आपण तिन्ही विधानसभा क्षेत्राचा आढावा कार्यकर्त्यांकडून घेतला. यावेळी भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका युती म्हणून लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कोणालाही बंधन नाही. मात्र, विद्यमान आमदार, खासदार असलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहेत.

त्यानुसार सावंतवाडी मधून पुन्हा दीपक केसरकर निवडणूक लढवतील. कुडाळ – मालवण बाबत काय निर्णय घ्यायचा, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरविणार आहेत. कणकवली मधून नितेश राणे पुन्हा निवडणूक लढवतील म्हणजे या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असणार आहे, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मंत्री सामंत यांनी मांडली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे