जिल्ह्याला युती सरकारकडून तीन हजार कोटींचा निधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या सेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तब्बल २७८५.८० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून स्वदेश दर्शन प्रादेशिक पर्यटन व अन्य योजनांचा निधी मिळून ३ हजार कोटींपेक्षा जास्तचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला युती शासनाच्या काळात खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो असे सांगत या निधीतून होत असलेली कामे दर्जेदार व्हावीत यासाठी पालकमंत्र्यांना आवाहन करणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई खात्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून विशेष ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आली आहेत. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातूनही प्रादेशिक पर्यटनमधून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच स्वदेश दर्शन च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ५६५ कोटींची कामे मंजूर असून त्यातील काही कामांचे आपण स्वतः उद्घाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी ही योजना सुरू केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र व राज्य सरकारचे त्यांनी यावेळी आभार मानले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यभार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५१ कोटींची कामे मंजूर झाली असून त्यातून विविध रस्ते, पूल, साकव, इमारती तसेच बांधकाम विभाग अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहे. तर पतन अंतर्गत बंधार्यांसाठी १०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
चक्रीवादळ तसेच इतर वादळामुळे किनारपट्टीच्या गावामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवून त्या ठिकाणी विजेचे पोल व हीच वाहिन्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता एकूण ८०४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून महावितरणच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Comments
Post a Comment