आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय
सिंधुदुर्गनगरी ता. २८: पूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो आता तसा राहिला नाही. यात बदल झाला आहे. हा बदल का झाला याबाबत शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांची आठवण कायम राहते. हा त्यांच्यासाठी खरा पुरस्कार असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी आज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपेढी सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकरी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख,उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, गटशिक्षणाधिकारी, शिक्षक संघटना पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे म्हणाले की, आज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. पुरस्कार वितरण सोहळा दिरंगाईने होत असल्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.तर पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.
पुढील वर्षी पुरस्कार वितरणाला दिरंगाई होणार नाही अशी हमी त्यांनी यावेळी दिली.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस म्हणाले की, विद्यार्थांना आदर्शवत घडवीणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा सत्कार केला जात आहे. ही चांगली बाब आहे. मात्र पूर्वी पुरस्कार प्राप्त शिक्षकाला समाजात एक विशिष्ठ मान सन्मान होता. मात्र आता तो हळू हळू कमी होत आहे. त्यामागची कारणे काय आहेत हे प्रत्येकाला माहीत आहेत. त्यामुळे शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो आता तसा राहिला नाही. यात बदल झाला आहे. हा बदल का झाला याबाबत शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
तसेच जेव्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण पुरस्कार साठी पात्र ठराल आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आठवण कायम जपून ठेवणे हा त्यांच्यासाठी खरा पुरस्कार असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी आज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नंदन घोगळे, श्रीमती स्नेहलता राणे तसेच जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments
Post a Comment