सिंधुदुर्गातील रुग्णांचा प्रश्न निश्चितच सुटेल:आ.आरोलकर
सावंतवाडी,दि.२६ मार्च
गोव्याच्या सीमेवर तूये येथे येत्या महिनाभरात गोवा बांबुळीच्या धर्तीवर सुसज्ज असे हॉस्पिटल, त्याचबरोबर पुढील सहा महीन्यात धारगळ येथे आयुषचे मोठे संशोधन केंद्र होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा प्रश्न निश्चितच सुटेल, त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कायम सकारात्मक आहोत, असे आश्वासन पेडणे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी आज येथे दिले.
आपण गोव्याचे असलो तरी सिंधुदुर्ग आणि गोव्याचे नातेसंबंध जोडलेले आहेत. आम्ही कायमच येथील लोकांना सहकार्य करतो. त्यामुळे कधीही हक्काने हाक मारा, मी निश्चितच मदत करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, गोवा बांबुळी येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आता चांगली बातमी आहे. तूये येथे गोवा-बांबुळी हॉस्पिटलच्या धरतीवर सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले जात आहे. तेच गोवा बांबुळीशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्याच दर्जाची सेवा या ठिकाणी सुद्धा उपलब्ध होणार आहे. तसेच आणखी सहा महिन्यांनी धारगळ येथे आयुष्य संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे. त्या ठिकाणी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Post a Comment