पत्रकार दिन शासकीय यंत्रणेतून साजरा करा:ना.चव्हाण
सिंधुदुर्गनगरी,ता.२७: नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी ही वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. लोक सहभागातून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा, असा मौलीक सल्ला देतानाच पुढील वर्षापासून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन साजरा करावा त्यासाठी विशेष निधीची तरतूद ठेवावी, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव-२०२२ चे उद्घाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष आफ्रिन करोल, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माजी आमदार राजन तेली, संजय आंग्रे, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या नंतर सरस्वती प्रतिमा, ग्रंथ पालखी आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. पालकमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले,जिल्ह्यातील १२८ ग्रंथालये हे जिल्ह्याचे परमवैभव आहे. कमी मानधनात देखील आपल्या आयुष्यातील मोलाचे क्षण या वाचन चळवळीत देणाऱ्यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. लोकांच्या सहभागातून जलयुक्त शिवार हे अभियान ज्या पध्दतीने यशस्वी झाले त्याच पध्दतीने नव्या पिढीसाठी वाचन चळवळ राबवण्यासाठी विचार आणि नियोजन व्हायला हवे. ग्रंथालयामध्ये तरुणाई कशी येईल यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्याच्यासमोर कथा-कथनाच्या स्पर्धा व्हायला हव्यात.
कानात शिरणाऱ्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्याची ताकद कथा-कथन सादरकर्त्यामध्ये आणि काव्य सादर कर्त्यामध्ये आहे. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसमोर व्हायला हवेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, वाचकांच्या मागणीनुसार पुस्तकांची उपलब्धता असायला हवी. देश महासत्तेकडे जात असताना पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व्हायला हवी, अशी पुस्तके ग्रंथालयात हवीत. जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रथा आणि परंपरा तयार कराव्या लागतील. सी.एस.आर फंडामधून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्याबाबत अहवाल तयार करावा.

Comments
Post a Comment