डॉ.बी.बी.गायतोंडे यांचा द्वितीय स्मृतीदिन २७ मार्चला;गोगटे वाळके महाविद्यालयात पुतळ्याचे अनावरण

 बांदा: जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार, बांदा गावचे सुपुत्र, गोगटे वाळके महाविद्यालय आणि बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स महाविद्यालयाचे संस्थापक (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा द्वितीय स्मृतिदिन २७ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावरण गोगटे वाळके महाविद्यालयाच्या मुख्य आवारात केले जाणार आहे.


डॉ. गायतोंडे यांनी परिश्रमपूर्वक आपले शालेय आणि उच्च शिक्षण अतिशय गुणवत्तापूर्ण श्रेणीत प्राप्त करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट, बॉम्बे हॉस्पिटल, इंडियन मेडिकल कौन्सिल इत्यादि भारतीय आणि जागतिक स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थामध्ये त्यांनी सन्मानाची पदे त्यांनी भुषवली आहेत. त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने त्यांची आशिया खंडाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. ते त्यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बांदा या आपल्या मूळ गावी राहून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य सुरू केले. गोगटे वाळके महाविद्यालयाची स्थापना करून दोडामार्ग आणि बांदा परिसरातील ७० खेड्यातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय केली. तसेच कोकणासाठी फाईन आर्ट्स कॉलेज असावे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. यातून बी. बी. गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांनी सावंतवाडी येथे बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स या महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय अनेक शाळांमधून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवले.

आरोग्य सेवेसाठी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करून सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मोफत आरोग्य सेवा आपल्या ट्रस्टमार्फत सुरू केली. त्यांच्या या कार्याची कृतज्ञता म्हणून गोगटे वाळके महाविद्यालयामध्ये सोमवार दिनांक २७ मार्च रोजी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचे शिक्षण प्रसारक मंडळ बांदा यांनी निश्चित केले आहे. सदरचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होणार असून या कार्यक्रमास बांदा परिसरातील नागरिकांनी, शिक्षणप्रेमीनी, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग आणि गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे