कुडाळ व वेंगुर्ले येथे २५ आणि २६ फेब्रुवारीला शास्त्रीय सुगम संगीताचा कार्यक्रम

 सिंधुदुर्ग:गोव्यातील स्वस्तिक संस्थेच्या संजीवन संगीत अकादमीतर्फे २५ व २६ फेब्रुवारीला वेंगुर्ला व कुडाळ येथे शास्त्रीय व सुगम संगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला राहणार आहे. शनिवार दिनांक २५ फेब्रुवारीला वेंगुर्ला येथे मधुसुदन कालेलकर सभागृहात संध्याकाळी ६ वाजता तर रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात संध्याकाळी ६ वाजता हा संगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे.     लोकप्रिय पार्श्वगायक पंडित सुरेश वाडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पणजी येथील संजीवन संगीत अकादमीत शास्त्रीय गायन, सारंगी वादन, संवादिनी वादन व तबला वादनाचे शिक्षण गेली ५ वर्षे दिले जात आहे. या अकादमीतून बरेच कलाकार तयार होत असून स्वतंत्र गायन व वादनाचे कार्यक्रम करत आहेत. या अकादमीत सारंगी या दुर्मीळ वाद्याचे खास वर्ग सुरू केले आहेत, ज्यासाठी ग्वाल्हेर येथून पूर्ण वेळ सारंगी शिक्षक नेमलेले आहेत. गोमंतकीय सुप्रसिद्ध गायक डॉ. प्रवीण गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अकादमीची यशस्वी वाटचाल चालू आहे.


      या कार्यक्रमात डॉ. प्रवीण गांवकर यांचे शास्त्रीय गायन, सारंगी वादक वसीम खान यांचे सारंगी वादन व पल्लवी पाटील, उर्वी फडके, आरती गावडे व डॉ. प्रवीण गांवकर यांचे भक्तीगीत व भावगीत सादरीकरण होणार आहे. त्यांना तबल्यावर उत्पल सायनेकर, संवादिनीवर मालू गांवकर, पखावजवर मनीष तांबोसकर व टाळ वाद्यावर कृष्णा परब साथ करणार आहेत. दोन्ही कार्यक्रमाचे निवेदन अनुक्रमे मानसी वाळवे व नेहा उपाध्ये करणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे अभिजात संगीत व संजीवन संगीत अकादमीच्या कार्याचा प्रसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे