उद्यापासून १२ वीची परीक्षा;कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज
सिंधुदुर्ग : माध्यमिक शालांन्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होत आहे. २१ मार्च २०२३ पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. १२ वी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेसाठी एकूण ९ हजार ४४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हास्तरावर एकूण ४ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व योजना शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली ही भारती पथके स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ९ परीरक्षक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रांचे कामकाज सुव्यवस्थित चालावे यासाठी परिरक्षक केंद्र व परीक्षा केंद्र यांच्या १०० मी परिसरात पोलिस अधिनियम ३८ (१) (३) कलम लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. परीक्षा केंद्रांच्या परिसरात एस.टी.डी. बुथ फॅक्स व झेरॉक्स मशिन, परीक्षा केंद्रामध्ये मोबाईलचा वापर इत्यादीवर नियंत्रणाचे दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश देण्याबाबत सूचना दिल्या गेल्या. परीक्षा कालावधीमध्ये वीज वितरण कंपनी, एस. टी. महामंडळ, पोलिस यंत्रणा इत्यादी विभागांना दक्ष राहण्याचे व सहकार्य करण्याचे बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सूचीत केले आहे. पोलिस अधिक्षक, यांना प्रत्येक तालुक्याच्या कस्टडीमध्ये एक ते तीन हत्यारी पोलिस बंदोबस्त व प्रत्येक परीक्षा केंद्रावर १ पोलिस बंदोबस्त देण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीजवितरण कंपनीच्या प्रमुखांना परिक्षा कालावधीत भारनियम न करणेबाबत व वीज पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवण्याच्या सूचना दिल्पा. एस. टी. महामंडळाच्या प्रमुखांना परीक्षा कालावधीत गाड्या वेळेवर सोडण्याच्या सूचना दिल्या.प्रत्येक परीक्षा केंद्रावर कलम ३७ (१) (३) चे फलक दर्शनी भागात लावावेत. सर्व तहसिलदारांना परीक्षा सुरळीत चालणे व कॉपीमुक्त अभियान राबवीणेबाबत पत्र देणे. कॉपीमुक्त अभियान संदर्भात सर्व प्रसिदधी माध्यमाव्दारे प्रसिदधी देण्यात यावी. परीक्षा तणावमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा कालावधीमध्ये सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, व कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे सूचीत करण्यात आले.

Comments
Post a Comment