कणकवली नगर पंचायतीच्या वतीने विधवा महिलांना अर्थसहाय्य
कणकवली, ता.१५ : कोविड मुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांना कणकवली नगरपंचायतीकडून प्रत्येकी २५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. आज या महिलांना या रक्कमेचे धनादेश नगरपंचायत कार्यालयात देण्यात आले.
कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना प्रत्येकी पंचवीस हजार रूपये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत सभेत घेतला होता. या निणर्याची आज अंमलबजावणी करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे पती गमावलेल्या महिलांना उद्योग, व्यवसाय करता यावा यासाठी ही छोटीशी मदत नगरपंचायतीच्या फंडातून करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिली. शहरात कोविडमुळे पती गमावलेल्या २० महिला आहेत. यात कागदपत्रांची पूर्तता झालेल्या १५ महिलांना आज धनादेश देण्यात आले. उर्वरीत पाच महिलांची कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे अशीही माहिती श्री.नलावडे यांनी दिली.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, महेश सावंत, लेखापाल प्रियांका सोंसुरकर, रुजुता ताम्हनेकर, आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment