सावंतवाडी जेलमधून फरार संशयित तब्बल दीड वर्षांनी पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी ता. ३०: अल्वपयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात सावंतवाडीतील “कॉरंटाईन जेल” मधून पळून गेलेल्या संशयिताला गोवा पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली. ही कारवाई मडगाव पोलिसांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा गुन्हा सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो कोरोनाकाळात सुरू असलेल्या कोलगाव आयटीआयमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. परंतू त्यावेळी खिडकीचे गज तोडून तो पळून गेला होता. प्रमोद मधूकर परब (४८) रा. कुडाळ, असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी पोलिस गोवा येथे गेले आहेत. तर उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे सावंतवाडीचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित संशयित ओरोस येथील पॉक्सो अंतर्गत कारवाईत सावंतवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत होता. दरम्यान कोरोना काळात कोलगाव-आयटीआय मध्ये सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित संशयिताने खिडकीचे गज तोडून पलायन केले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. तर संशयित कुठे आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा त्यावेळी पोलिसांकडून करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर संशयिताला ताब्यात घेण्यात गोवा पोलिसांना यश आले. त्याला मडगाव येथे अटक करण्यात आली आहे. तर याबाबतची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडीहून पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते आणि त्यांचे पथक गोव्याकडे रवाना झाले आहेत.

Comments
Post a Comment