कसाल येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

 ओरोस,ता.२३:कसाल येथील श्री सिद्धी विनायक मंदिर ४१ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


२५ जानेवारी २०२३ या दिवशी माघी गणेश जयंती असून, या निमित्ताने कसाल सिद्धिविनायक मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सध्या सुरू आहे.यात १५ जानेवारीपासून २२ जानेवारी पर्यंत श्रीमद् भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये श्रीमद् भागवत महापुराण प्रवचन नांदेड येथील वेद शास्त्र संपन्न श्री विश्वासशास्त्री घोडजकर यांच्या वाणीतून भाविकांना ऐकायला मिळाले. तर रविवार २२ जानेवारीला माणगाव येथील परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पालखीचा सोहळा साजरा करण्यात आला. तर दिनांक २३ ते २५ जानेवारी या कालावधीत गणेश विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर या कालावधीत प्रवचन, कीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी गणेश जयंती दिवशी पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री सिद्धिविनायक महापूजा, स्थापित देवता पूजा, उर्वरित हवन, बलिदान, पूर्णावती, ग्राम देव पालखी सह भेट तर दुपारी बारा वाजता गणेश जन्म सोहळा, महाआरती, गाऱ्हाणी त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तर त्यानंतर श्री सत्यनारायण व श्री सत्यविनायक नवसाच्या पुजांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर चित्र दिंडी होणार आहे. तर रात्री आठ वाजता स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर बक्षीस वितरण आणि रात्री दशावतारी नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भक्त गणांनी घ्यावा असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे