कुडाळ येथे २९ जानेवारीला हिंदू जनजागृती सभा
कुडाळ : कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर २९ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील हॉटेल स्पाईस कोकण येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. शंकर निकम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील आणि धर्मप्रेमी श्री. सतीश सामंत उपस्थित होते.
या वेळी श्री. मणेरीकर यांनी सांगितलेकी, देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहेत; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय अथवा आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते, मग मशिदी-चर्च यांचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’!. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट म्हणजे ‘हलाल जिहाद’!. यांसारख्या हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे हिंदु राष्ट्र-जागृतीचे कार्य करत आहे. आज भारतातील २८ राज्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये समितीचे कार्य सुरु आहे. अशा प्रभावीपणे कार्यरत असणार्या हिंदु जनजागृती समितीची ही सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे, ही धर्मप्रेमी हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत
या सभेचा प्रचार-प्रसार कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या तालुक्यांत करण्यात येत आहे. विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका (कॉर्नर मिटिंग), भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे.
२४ जानेवारी या दिवशी कुडाळ शहरात वाहनफेरीचे आयोजन
या सभेच्या प्रचारासाठी २४ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता कुडाळ शहरातून भव्य वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या वाहनफेरीचा म्हापसेकर तिठा (पिंगुळी) येथे प्रारंभ होऊन गवळदेव, पोलीस ठाणे, एस्.टी. बसस्थानक, मुख्य बाजारपेठ, समादेवी मंदिर, पानबाजार, हॉटेल गुलमोहर, लक्ष्मीवाडी, वाचनालय, समादेवी मंदिर, शिवाजी महाराज चौक मार्गे जिजामाता चौक येथे आल्यावर फेरीची सांगता होणार आहे. या फेरीसह २९ जानेवारी २०२३ या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Comments
Post a Comment