त्रिंबकच्या बाळा भाट यांच्या कडून गगनगडावर नगारा भेट
साडेतीन फूट व्यास व अडीज फूट उंचीचा नगारा
लक्षवेधी
प्रतिनिधी-चिंदर
मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील सुप्रसिद्ध पखवाज मेकर सुभाष भाट यांनी स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेला सुमारे साडे तीन फूट व्यासाचा नगारा परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा योग साधून गगनगिरी मठ येथे महाराजांच्या चरणी भेट दिला आहे. १९ जानेवारी रोजी गगनगिरी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने गगनगडावर काकड आरतीच्या वेळी या नगाऱ्याच्या नादाने अक्खा गगनगड दुमदुमुन गेला आहे.
सुभाष भाट हे बाळा भाट या नावाने परिचित आहेत. गत वर्षी घटस्थापनेस ते वायंगणी येथील सचिन रेडकर यांच्या सोबत गगनगड येथे मठात गेले होते. त्यानंतर पुन्हा नवरात्र उत्सवात तेथे गेल्या नंतर काही ईश्वरी संकेत त्यांना मिळाल्या नंतर मठासाठी मोठा नगारा भेट देण्याचा त्यांनी निश्चय केला. गावी आल्यानंतर कामाला लागत लागलीच त्यांनी संतोष पवार या वेल्डिंग वाल्याना गाठत आवश्यक आकारामध्ये धातूच्या जाड पत्र्याचा नगाऱ्याचा बेस बनवून घेतला. सुमारे साडेतीन फूट रुंद व अडीज फूट उंचीच्या नगारा चामड्याच्या बनविण्यात आला आहे. बाळू भाट यांनी काहि वर्षा पूर्वी दगडाचा तबला बनविला होता. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे आणि सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन या सारख्या दिगग्ज कलाकारांनी त्या तबल्याची प्रशंसा केली होती.
त्यांनी सजविलेले अनेक तबला, मृदुंग, पखवाज अशी चर्मवाद्य केवळ सिंधुदुर्गातच नाहीत तर महाराष्ट्र- गोवा अशा अनेक राज्यातील अनेक भजनी मंडळे, गायक, वादक व संगीत प्रेमी घेऊन जातात. नगारा बनवताना अनेक वेळा महाराजांच्या शक्तीची अनुभूती आल्याचे भाट हे सांगतात. गगनगड येथे आरती चालू होण्यापूर्वी भक्तांना हा नगारा वाजवून सूचित केले जाणार आहे. बुधवारी बाळा भाट यांनी सदर नगारा गगनगिरी ट्रस्ट कडे सुपूर्द केला. नगारा भेट दिल्या बद्दल देवस्थान कडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. एक आगळंवेगळं चर्मवाद्य गुरू चरणी समर्पित केल्याबद्दल भाट यांचे कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment