मोपा ५ जानेवारीपासून उड्डाणासाठी सज्ज, परिसरात पाच मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...

विमानतळ सुरू होण्यापूर्वी आज स्थानिकांना मिळाली पाहण्याची संधी...

पणजी ता. २८:मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ ५ जानेवारीपासून उड्डाणासाठी सज्ज होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिवसाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशी १५० विमाने उतरणार आहेत, अशी माहिती मोपा विमानतळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मिलिंद पैदलकर यांनी दिली. दरम्यान या ठिकाणी ५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत विमानाची तपासणी करण्यासाठी बाजूलाच सुरक्षित जागा सुद्धा ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. उद्घाटनानंतर विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिकांना पाहण्यासाठी ते खुले करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना  श्री.पैदलकर यांनी ही माहिती दिली.


     ते पुढे म्हणाले, विमान उड्डाणासाठी आवश्यक सर्व सोई - सुविधा पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत विमानतळ सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते ही लवकरच पूर्ण होईल. तर येथील विद्युत पुरवठा सौर ऊर्जेवर होणार असून ५ मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्या सारख्या आपत्कालिन परिस्थितीत विमाने उतरवण्यासाठी आणि तपासणीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तो परिसर मुख्य धावपट्टी पासून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत रनवेच्या बाजूला दोन ठिकाणी अग्निशमन यंत्रणादेखील अलर्ट असणार आहे, असे ते म्हणाले.

           या विमानतळाचे उद्घाटन नुकतेच झाल्या नंतर ५ जानेवारीपासून ते उड्डाणासाठी सज्ज होत आहे. याठिकाणी पहिल्या टप्प्यात दिवसाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशी १५० विमाने उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज हे विमानतळ स्थानिकांना आणि विशेषतः भूमिपुत्रांना पाहण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली होती. यावेळी दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ५:०० पर्यंत विमानतळ परिसरात मोठी गर्दी झाली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासण्या करूनच सर्वांना आज प्रवेश दिला जात होता. त्यामुळे ठिकठिकाणी तपासणीसाठी रांगा दिसून आल्या.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे