पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी एकसंघ समन्वयातून काम करणार:बाबा मोंडकर
वेंगुर्ले:सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला असून या जिल्ह्यामध्ये अजून पर्यटन व्यवसाय वृद्धिगत करायचा असेल तर आम्हा सर्व पर्यटन व्यवसायिकांना एकसंघ होऊन संघर्षातून नाही तर समन्वयातून काम करायचे आहे, असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी वेंगुर्ले येथे केले. दरम्यान वेंगुर्ले येथे 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी “पर्यटन मेळावा” भव्य स्वरूपात आयोजित केला आहे असेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुरीझमला गतिमान करण्याचा महासंघाचा उद्देश आहे. म्हणूनच जागतिक पर्यटन दिनी म्हणजे मंगळवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 यावेळेत वेंगुर्लेत होणाऱ्या जिल्हास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळाव्यात केंद्र व राज्य शासनातील मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती श्री. मोंडकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजीत पत्रकार परीषदेत दिली.
येथील साईमंगल कार्यालयात पर्यटन व्यावसायिक महासंघ, सिंधुदुर्गतर्फे वेंगुर्लेसह जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात विविध स्वरूपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक श्री. मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पर्यटन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, महेश सामंत, प्रथमेश सावंत, दिलीप कुडव, प्रवीण सामंत, उमाकांत आरावंदेकर, संग्राम सावंत, मधुर चिपकर, गुरूनाथ गिरप, नामदेव भुते, गुरूनाथ उर्फ नाथा मडवळ, गोविंद केळूसकर, विजय ठाकूर, अरूण बागकर, गोविंद बागकर, नेहा वेर्णेकर यांच्या सह पर्यटन व्यवसाय करणारे व्यावसायिक उपस्थित होते.

Comments
Post a Comment