न्हावेली-नागझरवाडी येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

 सावंतवाडी : न्हावेली येथील नागझरवाडी येथे राहणारे रुपेश कृष्णा सवाळ यांना आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घराशेजारी असलेल्या चिरेबंदी विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय सावंतवाडी येथे संपर्क साधला. याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर हे आपल्या बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके हे ही आपल्या बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले.


विहिरीचे निरीक्षण केले असता बचाव पथकाला असे निदर्शनास आले की विहिर ही एकूण 40 फुट खोल असून कठड्यापासून सध्याची पाण्याची पातळी अंदाजे 15 फुटावर आहे. काल रात्रीच्या अंधारात कोंबड्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आल्यावर विहिरीचा अंदाज न आल्यामुळे अपघाताने हा बिबट्या विहिरीत पडला असावा, जीव वाचवण्यासाठी बिबट्याने विहिरीच्या पाणीपातळीच्या जवळ असलेल्या खोबणीचा सहारा घेतला. खोबणही विहिरीच्या भिंतीत गुहेप्रमाणे 3 ते 4 फूट आत पर्यंत पोकळ असल्याने बिबटा त्या खोबणीचा सहारा घेऊन त्यात लपून बसला होता. बघ्यांची वाढत असलेली गर्दी, खोबणीत दडून बसलेला बिबट्या अन वरून सतत पडत असलेला मुसळधार पाऊस या सर्व आव्हानांचा वन विभागाच्या बचाव पथकाला सामना करावा लागला. या आव्हानांवर संयमाने मात करत वनविभागाच्या बचाव पथकाने बिबट्याला यशस्वीरीत्या लोखंडी पिंजऱ्यात कैद केले.

हा बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा वाढ झालेला नर असून त्याची वन्यजीव वैद्यकीय डॉक्टर यांचेकडून तपासणी करण्यात आली. बिबट हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी पूर्णतः निरोगी असलेचे या तपासणीमध्ये दिसून आले. त्यानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले. या बचावकार्यात न्हवेलीच्या गावकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले. बचावकार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अप्पासो राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर या सर्वांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे