सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधीचौक बांदाच्या रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
बांदा:रांगोळीतून वास्तवतेचा आभास आणि सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधीचौक या मंडळाने राबवला.या उपक्रमात जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळी कलाकारांनी घातलेल्या रांगोळ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
या रांगोळी प्रदर्शनात गणेशाच्या मूर्तींची प्रतिमा
साकारण्यात आली आहे.तर अनेक पुरस्कार प्राप्त समीर चांदरकर यांनी चाकरमान्यांची वाट पाहणारी माता 'झाली तयारी बाप्पाच्या आगमनाची, आतुरलेले डोळे पाहती वाट चाकरमान्यांची' रांगोळीतून साकारताना वास्तवता विशद केली आहे.
तर ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांच्या मनातील भाव 'बाप्पा आला दारी,तरी आम्ही नाही आमच्या घरी' या रांगोळीतून केदार टेमकर याने साकारत पोलीस कर्मचाऱ्यांची मनातील वेदना मांडली आहे.
सिद्धेश धुरी याने 'चौसष्ट कलांचा,चौदा विद्यांचा अधिपती' हा आविष्कार साकारत लक्ष वेधून घेतलं आहे.लहान मुलगी आपल्या लाडक्या बाप्पाकडे मोदकाची मागणी करणारी रांगोळी कु.श्रेया समीर चांदरकर हिने 'दे ना बाप्पा, दे ना मोदक मला!' यातून साकारली आहे.पर्यावरणाचा संदेश देत मातीचा बाप्पा पूजण्याचा पर्यावरण संदेश 'बाप्पा माझा मातीचा,पर्यावरणाच्या साथीचा' या रांगोळीतून गौरेश राऊळ याने दिला आहे.कु.सायली भैरे हिने 'तूच करता आणि करविता' ही अप्रतिम रांगोळी साकारली.गणेशोत्सवा नंतर गणेश विसर्जनाच्या वेळी लहान मुलांच्या मनातील भाव 'बाप्पा चालले आपल्या गावाला,चैन पडेना आमुच्या मनाला' या रांगोळीतून पूर्वा चांदरकर हिने साकारले असून या सर्वच रांगोळ्या प्रेक्षकांचा लक्ष वेधून घेत आहेत.

Comments
Post a Comment