भटक्या,बेवारस कुत्र्यांसाठी खाकी वर्दीतील 'ज्योती' बनलीय अन्नपूर्णा

बांदा: समाजात निराधार मुले , अपंग , वृद्ध यांचे माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही लोक आधार बनत असतात ; मात्र बांदा पोलिसात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी ज्योती हरमलकर या बांदा शहर व परिसरातील भटक्या श्वानांसाठी ' अन्नपूर्णा ' बनल्या आहेत . दिवसरात्र व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दररोज रात्री सौ . हरमलकर या रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना पोटभर खायला घालतात . एवढेच नाही तर रस्त्यावर बेवारस भटकणाऱ्या शेकडोकुत्र्यांच्या पिल्लांचे संगोपन देखील त्या करत आहेत . पोलिसांविषयी जनतेच्या मनात अनेक गैरसमज असतात ; परंतु पोलिस कर्मचारीही माणूसच असतो . त्यालाही संवेदनशील मन असते . या घटनेतून सौ . हरमलकर यांच्या खाकी वर्दीमागे दडलेल्या माणुसकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे . 


चार वर्षांपूर्वी ज्योती हरमलकर या बांदा पोलिस ठाण्यात रुजू झाल्या . त्यापूर्वी त्या दोडामार्ग येथे कार्यरत होत्या . त्यांना मुक्या प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे . त्यांना लहानपणापासूनच कुत्र्यांचा लळालागला . लग्न झाल्यानंतरही त्यांनी आपली श्वानसेवा सुरूच ठेवलो . बांदा शहरात आल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री निदर्शनास आली . या कुत्र्यांची अन्न न मिळाल्याने होणारी उपासमार त्यांनी पाहिली . त्यांनी या कुत्र्यांसाठी स्वतः अन्नपूर्णा बनण्याचा निर्णय घेतला . रात्री अपरात्री त्या शहरातील बेवारस व भटक्या कुत्र्यांना नियमितपणे जेवण घालतात . सौ . हरमलकर यांनी ठराविक शीळ घालताच भटकी कुत्री शेपटी हलवत लाडाने तिच्या मागे चालू लागतात . कुत्रा हा माणसासोबत इमानाने वागणारा प्राणी आहे . समाजात माणुसकी हरवत चालली असून या बेवारस कुत्र्यांना मायेचा लळा लावल्यास ते देखील माणसांशीइमानाने वागतात हे हरमलकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे . बांदा शहरात कुठेही सेवा बजाविताना हे कुत्रे कायम पाठीशी असतात . पोलिस तपासणी नाक्यावर सौ . हरमलकर या कार्यरत असताना देखील हे कुत्रे नेहमीच त्यांच्या मागे पुढे करत असतात . गेल्या चार वर्षात येथील शेकडो बेवारस कुत्र्यांना त्या नियमितपणे अन्नदान करत आहेत . केवळ यावरच न थांबता जखमी झालेल्या कुत्र्यांची त्या सुश्रूषा देखील करतात .त्यांच्या औषधउपचाराचा खर्च त्या स्वतः उचलतात . रस्त्यावर जन्माला आलेली कित्येक कुत्र्यांच्या पिल्लांची त्या स्वतः काळजी घेतात . तसेच ज्यांना गरज असेल व पिल्लांचे संगोपन करण्यासाठी सक्षम आहेत अशांना कुत्र्यांची पिल्ले सांभाळण्यासाठी देतात . त्यांची वेळोवेळी माहिती देखील त्या घेत असतात . कुत्र्यांसोबतच रस्त्यावर सोडलेल्या मांजरीची पिल्ले यांची देखील त्या काळजी घेतात . जखमी प्राण्यांना तात्काळ व वेळेत उपचार मिळविण्यासाठी प्रसंगी त्या प्रशासनाशी भांडतात देखील . काही दिवसांपूर्वी इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे कार्यरत असताना गाडीला धडकून जखमी झालेल्या वानराच्या पिल्लाला त्यांनी पाणी पाजून प्रथमोपचार केले होते . त्यानंतर त्याला स्वतःच्या खर्चाने सावंतवाडी येथे वनखात्याच्या कार्यलयात नेऊन पुढील उपचार मिळवून दिले होते . यामुळे वानराच्या पिल्लाचे प्राण वाचलेत . कुत्र्यांना दगड मारून जखमीकरणाऱ्यांचा त्यांना प्रचंड तिरस्कार आहे . आपण याठिकाणी असेपर्यंत कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले . बांदा पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांनी बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे .

 बांदा शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे . या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे . आपण केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे काम करत असून समाजाने देखील या कार्यात उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा  असे आवाहन ज्योती हरमलकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे