जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर एकदाच गाड्यांची तपासणी करणारी यंत्रणा राबवा:ना.केसरकर

 बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख देणारे बांदा येथे प्रवेशद्वार उभे करावे, त्याठिकाणी आरटीओ पोलिस आणि एक्साईज यांची एकाच ठिकाणी तपासणी करण्यात यावी, त्यानंतर जिल्ह्यात अन्य कोठेही गाड्या तपासल्या जावू नयेत, त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवा, अशा सुचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिल्या. दरम्यान बांदा येथे उभारण्यात येणार्‍या प्रवेशद्वारावर पर्यटकांना थांबवण्यासाठी चांगल्या सुविधा, रेस्टॉरंट आणि बगीच्या उभारण्यात यावा, आणि त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी काल (शुक्रवारी) सायंकाळी उशिरा बांदा येथील नियोजित प्रवेशद्वाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबधित अधिकार्‍यांना त्यांनी या सुचना दिल्या.


मंत्री श्री. केसरकर यांनी बांदा येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावरील सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, क्षेत्रिय वन अधिकारी विद्या घोडके, तहसिलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक शामराव काळे, सरपंच अक्रम खान आदी उपस्थित होते.शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ॲथोरेटीने एमटीडीसीच्या विभागाबरोबर उद्याच जागेची पाहणी करावी. या प्रवेशव्दारावर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उभाराव्यात. या ठिकाणी माहिती पत्रके वाटण्यासाठी माहिती केंद्र उभे करावे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एलईडी स्क्रीनवर दर्शवावी. सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभाग, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी एकाच ठिकाणी करावी. त्या वाहनांची जिल्ह्यात कोठेही पुन्हा तपासणी होणार नाही असे स्टीकर गाडीवर लावावेत.

बांदा येथील किल्ला पर्यटनासाठी खुला करुन बांदा पर्यटन नकाशावर येईल त्या दृष्टीने नियोजन करावेत. वन विभागाने आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांनासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. पार्किंग पासून धबधब्यापर्यंत पर्यटकांना सोडण्यासाठी बॅटरीवरील वाहनांची सोय करावी. यासाठी माजी सैनिक तरुण वर्गाचे सहकार्य घ्यावे. आंबोली येथील चारही धबधब्यांची पर्यटकांसाठी साखळी करावी. कावळेसादला पोलीस चौकी बांधावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्यात.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे