पाऊस थांबला,पाणी ओसरले;बांदा आळवाडा येथील स्थिती पूर्वपदावर
बांदा:ऑगस्ट महिन्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवार पासून जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे.काल बांदा परिसरात सायंकाळ पासून मुसळधार संततधार सुरू असल्याने बांदा परिसरातील सर्वच नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून बांदा परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बांदा येथील तेरेखोल नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या परिसरात पाणी नदी पात्राबाहेर येत लोकवस्तीत घुसले.बांदा आळवाडा बाजारपेठेत पाणी घुसल्याने येथील दुकानदारांची तारांबळ उडाली.दरम्यान येथील व्यवसायिकांनी स्थनिकांच्या मदतीने आपलं किंमती सामान सुरक्षित स्थळी हलवलं.
बांदा-आळवाडा भागात नेहमीच पुराचे पाणी येत असल्याने नागरिक सतर्क असतात.या पुराच्या पाण्यापासून बांदा मुख्य बाजारपेठ दूर असल्याने सुरक्षित आहे.बांदा बाजारपेठेला पुराचा कोणताही धोका उदभवत नाही.
दरम्यान या भागातील पुरसदृश्य परिस्थितीची अगोदरच कल्पना असल्याने ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन व महसूल स्थानिक यंत्रणा अलर्ट होती.बांदा सरपंच अक्रम खान,बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,उपनिरीक्षक समीर भोसले,तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, जावेद खतीब,माजी सरपंच बाळा आकेरकर आदींसह स्थानिक मदतीसाठी याठिकाणी उपस्थित होते.
आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर ओसरताच आळवाडा येथील पुराचे पाणी ओसरले आहे.दरम्यान प्रशासनाने नदी जवळील सर्वच गावानां सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Comments
Post a Comment