कळणेच्या 'वेदीका'ची साता समुद्रापार भरारी

 दोडामार्ग:महत्वकांक्षेला कष्ट व जिद्दीची जोड दिल्यास जगात अशक्यप्राय अशी कोणतीही गोष्ट नाही. हीच बाब कळणे (ता. दोडामार्ग) येथील वेदिका संतोष देसाई या युवतीने सिद्ध करुन दाखविली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या युवतीची अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेटमध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी झालेली निवड निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. तिच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


या यशाबद्दल बोलताना वेदिका म्हणाली, मी एका ग्रामीण सामान्य शेतकरी कुटुंबातील. आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम. मात्र आईवडिलांची इच्छा होती की मी इंग्लिश मिडियमधून शिकावे. आजूबाजूला इंग्लिश माध्यमाच्या शाळा नव्हत्या. त्यामुळे भेडशी येथील करुणा सदन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरापासून शाळा सुमारे २५ किमी दूर होती. वडील दररोज शाळेत नेऊन सोडायचे व पुन्हा न्यायला येत असत. वडिलांचे दोडामार्ग बाजारपेठेत छोटेसे घडाळ्याचे दुकान आहे. माझ्या शिक्षणासाठी माझ्यापेक्षा वडिलांनी घेतलेली मेहनत खूप मोठी होती. दहावीत ९३ टक्के गुण मिळवून मी उत्तीर्ण झाले.

त्यानंतर सायन्स शाखेसाठी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील कॉलेजला प्रवेश घेतला. त्यानंतर सावर्डे -चिपळूण येथील एसपी कॉलेज मधून बी. टेक इन फूड टेक्नॉलॉजी ही पदवी घेतली. अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी पदवीच्या दुसर्‍या वर्षापासूनच प्रवेश परीक्षांचा अभ्यास सुरु केला होता. त्यात यश मिळेल असा विश्चासही होता. प्रवेश परीक्षेत घवघवीत यशाने उत्तीर्ण झाल्याने एनजेआयटी या प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. माझ्या या यशात माझ्यापेक्षा आईवडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे ती सांगते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे