वेरली धनगर वाडी रस्त्याची बाळा गोसावी यांनी केली पाहणी..
मसुरे:वेरली धनगर वाडी येथील ग्रामस्थांचा गेली कित्येक वर्ष येथील रस्त्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून येथील ग्रामस्थांनी यासाठी वेळोवेळी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी वर्गाची वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे भटक्या विमुक्त सेलचे मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी यासंदर्भात येथील ग्रामस्थांची भेट घेऊन या रस्त्या संदर्भात जास्तीत जास्त पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन येथील ग्रामस्थांना दिले.
वेरली धनगरवाडी येथील येथील ग्रामस्थांना उपयुक्त असा रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे या सर्व ग्रामस्थांना सुमारे चार किलोमीटर पायपीट करून डोंगरदरीतून आपले घर गाठावे लागत आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी तसेच स्थानिक ग्रामपंचायतीने ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या रस्त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे ही प्रशासन दप्तरी सादर केली गेली परंतु अद्याप पर्यंत येथील ग्रामस्थांना हा रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येथील ग्रामपंचायत ने काही प्रमाणात या रस्त्याचे काम केलेले आहे. हा रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ, अबालृद्ध महिला, आजारी रुग्ण, शालेय मुले यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच संध्याकाळनंतर या भागातून जाताना जंगली श्र्वापदांची ही भीती येथील ग्रामस्थांच्या मनात आहे. निदान रिक्षा जाण्या इतपत तरी या रस्त्याचे शासनाकडून काम करून मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारी भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जाती सेलचे मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी या रस्त्याची सुमारे चार की. मी. पायी चालत जाऊन पाहणी करून स्थानिक ग्रामस्थांची भेट घेतली. या रस्त्या संदर्भात सुयोग्य पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी या ग्रामस्थांना दिले. तसेच वेरली ग्रामपंचायत येथे भेट देऊन सरपंच आनंदी परब, उपसरपंच चव्हाण यांचीही भेट घेऊन या रस्त्या संदर्भात माहिती घेतली. या रस्त्या संदर्भात येथील धनगर समाजाची परवड दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, सर्व ग्रामस्थ,लोक प्रतीनिधी यांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही यावेळी बाळा गोसावी यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत रामा शिंगाडे, सुरेश खरात, लक्ष्मण शिंगाडे, बाबुराव खरात, सीता शिंगाडे, रामा मसुरकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment