उसप,माटणे पंचक्रोशीतील त्या गावांचा तिलारी धरण लाभ क्षेत्रात समावेश करा
मुंबई:उसप व माटणे पंचक्रोशीतील गावांचा समावेश तिलारी धरणाच्या लाभ क्षेत्रात करून या पंचक्रोशीतील गावाना तिलारीचे पाणी मिळावे यासाठी दोडामार्गचे माजी उपसभापती लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेत मागणीचे निवेदन दिले.यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते आ.दीपक केसरकर यांनाही निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की,तिलारी धरणाचे पाणी उसप पंचक्रोशीतील खोक्रल,उसप, झरेबांबर, पिकुळे,आंबेली तसेच माटणे पंचक्रोशीतील वझरे,आंबडगाव, आयी,माटणे ,तळेखोल या गावानां मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक होते.याचा पाठपुरावा केला असता संबंधित विभागाकडून ही गावे लाभक्षेत्रात येत नसल्याने या गावाना पाणी देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान या गावाना पाणी दिल्यास पडीक जमिनी पुन्हा ओलिताखाली येऊन जीवनमान उंचावू शकते.त्यामुळे या गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कोनाळ सरपंच पराशर सावंत,सुनील गवस,आंबडगाव ग्रामस्थ भिवा नाईक,प्रमोद गवस,दादा पालयेकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment