पाडलोस येथे पाच फुटी कोब्राला जीवदान;काहीवेळ घरातील मंडळींचा थरकाप
सर्पमित्राने सोडले नैसर्गिक अधिवासात बांदा:जय भोसले बांदा दि.०८ -:संध्याकाळच्यावेळी पाडलोस केणीवाडा येथील प्रभाकर कुबल यांच्या घरातील लाकडात घुसलेल्या पाच फुट कोब्रा जातीच्या सापाने सर्वांनाच घाबरवून सोडले. फणाधारी साप पाहून सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. परंतु महेश कुबल यांनी सर्पमित्र रवींद्रनाथ रेडकर यांना बोलावून त्या सापाला पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडले. घरातील लाकडातून अचानकपणे आवाज येत असल्याचे प्रभाकर कुबल यांना समजले. आवाजावरून काही लाकडे बाजूला केली व पाहिल्यास तो साप असल्याची खात्री झाली. याची खबर पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांना देण्यात आली. त्यांनी सदर साप पाहून सातार्डा येथील सर्पमित्र रवींद्रनाथ रेडकर यांना बोलावले. लाकडे असल्यामुळे सापाला पकडण्यात अडचण निर्माण झाली होती. परंतु दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी रेडकर यांना त्या सापाला पकडण्यात यश आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या पाच फुटी कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.